अरेच्चा…आता हार्ट स्कॅनरने लॉगीन करता येणार !

0

फिंगरप्रिंट आणि बायोमॅट्रीक स्नॅकरच्या पुढील तंत्रज्ञान आता विकसित करण्यात आले असून लवकरच चक्क हार्ट स्कॅन करून स्मार्टफोन वा संगणकावर लॉगीन करता येणार आहे.

स्मार्टफोनवर सुरक्षितपणे लॉगीन करण्याचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा असाच आहे. स्मार्टफोन हा संबंधीत युजरशिवाय इतराने वापरू नये यासाठी बहुतांश कंपन्यांनी विविध फिचर्स प्रदान केले आहेत. यात अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात बोटाच्या ठशाने स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. हे तंत्रज्ञान आता बर्‍यापैकी प्रचलीत झाले आहे. यासाठी आयरिस स्कॅनर, फेस आयडी आदी बायोमॅट्रीक स्कॅनिंगच्या सुविधादेखील काही उच्च श्रेणीतल्या मॉडेल्समध्ये देण्यात आल्या आहेत. अलीकडे लाँच करण्यात आलेल्या आयफोन्समध्ये ‘फेस आयडी’ हे विशेष फिचर प्रदान करण्यात आले आहे. आता तंत्रज्ञानाने याचा पुढील टप्पा गाठला आहे. अमेरिकेतील बफेलो विद्यापीठातील तंत्रज्ञांच्या एका चमूने चक्क हार्ट स्कॅन करून स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्याची प्रणाली विकसित केली आहे.

तंत्रज्ञांच्या या चमूने कमी क्षमता असणारे डॉपलर रडार तयार केले आहे. हे रडार कमी क्षमतेचे असून स्मार्टफोनच्या तुलनेत फक्त १ टक्के इतके रेडियेशन करते. तसेच याची क्षमता एखाद्या कमी क्षेत्रफळाची व्याप्ती असणार्‍या वाय-फाय नेटवर्कपुरती मर्यादीत असल्यामुळे आरोग्यासाठी ते हानीकारक नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमध्ये हे रडार लावण्यात आल्यास संबंधीत उपकरण हे त्याचा युजरच वापरतो की नाही? यावर सातत्याने नजर ठेवून असते. यातील हृदयाचे ठोके हे दुसर्‍या व्यक्तीचे आढळून आल्यास तो स्मार्टफोन वापरता येत नाही.

जगात ज्याप्रकारे दोन व्यक्तींच्या बोटाचे ठसे सारखे नसतात, अगदी त्याचप्रमाणे दोन व्यक्तींच्या हृदयाचा आकार, पॅटर्न आणि ठोके सारखे नसतात. नेमकी हीच बाब लक्षात घेत हार्ट स्कॅनर तयार करण्यात आल्याची माहिती या तंत्रज्ञानाला विकसित करणार्‍या चमूचे प्रमुख वेनयाओ झू यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. या तंत्रज्ञानाच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट आदी उपकरणांमध्ये ही प्रणाली वापरण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचेही झू यांनी सांगितले आहे. याशिवाय विमानतळासारख्या ठिकाणी या प्रणालीच्या मदतीने अगदी ३० मीटर अंतरावरूनही एखाद्या व्यक्तीची पडताळणी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here