अरेच्चा…आता बॅटरीविना चालणारा मोबाईल !

0

बॅटरीविना चालणार्‍या मोबाईलची आपण कल्पनादेखील करू शकत नसलो तरी तंत्रज्ञांनी आता याच पध्दतीचा हँडसेट विकसित करण्यात यश मिळवले आहे.

बॅटरी हा मोबाईल आणि अन्य उपकरणांचा अविभाज्य घटक आहे. यामुळे प्रत्येक उपकरणात उत्तम दर्जाची बॅटरी असावी याकडे ग्राहकांचा खास कटाक्ष असतो. अर्थात कंपन्यादेखील चांगल्या बॅटरींनी सज्ज असणारे मोबाईल हँडसेट लाँच करत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांच्या एका पथकाने चक्क बॅटरीविना चालणारा मोबाईल विकसीत केला आहे. याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. यात रेडिओ लहरी आणि प्रकाशापासून उर्जा मिळवण्यात येते. यासाठी यात तांदळाच्या आकाराचे पॅनल प्रदान करण्यात आले आहे.

आपल्या भोवती रेडिओ लहरी आणि प्रकाश हे दोन्ही घटक विपुल प्रमाणात आणि अर्थातच मोफत उपलब्ध असतात. यामुळे याच स्त्रोतांपासून उर्जा मिळवून या चमून मोबाईल हँडसेटचा प्रोटोटाईप तयार केला. विशेष म्हणजे याची स्काईप कॉलिंगच्या माध्यमातून यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली. यात ध्वनी आणि माहितीचे (डाटा) सहजगत्या वहन होते. यासाठी या चमूने वाय-फाय राऊटरच्या मदतीने संबंधीत प्रोटोटाईपला उर्जेचा पुरवठा करण्यासाठी एक बेस स्टेशन तयार केले. यामुळे बॅटरी नसतांनाही याला कार्यान्वित करता आल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, सध्या जगाच्या बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क आहे. याच लहरींचा वापर करून सतत कनेक्ट असणारा आणि अर्थातच त्यापासून उर्जा मिळवणारा मोबाईल हँडसेट तयार करणे आता सोपे झाले आहे. शास्त्रज्ञांच्या या चमूमध्ये मूळचे भारतीय वंशाचे शाम गोळकोटा यांचीही समावेश आहे हे विशेष ! सध्या याचा प्रोटोटाईप यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यामुळे आगामी काळात अशाच पध्दतीचा अर्थात बॅटरीविना चालणारा मोबाईल हँडसेट बाजारपेठेत उतारणे शक्य होणार आहे.

पहा: बॅटरीविना चालणार्‍या मोबाईल हँडसेटच्या प्रोटोटाईपची माहिती देणारा हा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here