अरेच्चा…आता जीआयएफ अ‍ॅनिमेशन प्रिंट करणारा कॅमेरा !

0

आपल्या डिजीटल आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या जीआयएफ अ‍ॅनिमेशन इन्स्टंट पध्दतीने प्रिंट करणारा कॅमेरा एका हुरहुन्नरी भारतीय तरूणाने विकसित केला आहे.

अभिषेक सिंग या भारतीय तरूणाने सध्या तंत्रज्ञानविश्‍वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ‘इन्स्टाजीफ’ हा इन्स्टंट कॅमेरा विकसित केलेला आहे. अर्थात यात काय नवल ? असे कुणीही म्हणू शकेल. तथापि, हा अन्य इन्स्टंट कॅमेर्‍यांप्रमाणे तात्काळ प्रतिमा छापून देत नाही, तर तो चक्क जीआएफ अ‍ॅनिमेशनची प्रिंट काढण्यास सक्षम आहे. आता जीआयएफ अ‍ॅनिमेशनमध्ये हलणारी प्रतिमा कागदावर कशी छापली जाईल? हा प्रश्‍न उपस्थित होतो. यासाठी अभिषेकने अफलातून शक्कल लढवत एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे. अर्थात त्याने तयार केलेल्या कॅमेर्‍यातून काही सेकंदांचा लूप व्हिडीओ घेतल्यानंतर लागलीच याला जीआयएफ अ‍ॅनिमेशनमध्ये परिवर्तीत करून त्याची एलसीडी डिस्प्लेवर प्रतिमा घेतली जाते. अर्थात त्या डिस्प्लेवर ही प्रतिमा ‘प्रिंट’ केली जाते. याच्या मदतीने सेल्फीसह समोरच्या व्यक्तीच्या व्हिडीओजच्या जीआयएफ अ‍ॅनिमेशन्सलाही प्रिंट करणे शक्य आहे.

अभिषेक सिंग याने हा कॅमेरा तयार करण्यासाठी ‘रास्पबेरी पाय’ या मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरचा उपयोग केला आहे. हे मॉडेल पोलरॉइड कंपनीच्या ‘वन स्टॉप कॅमेरा: एसएक्स-७० या मॉडेलवर आधारित आहे. मात्र याचे सर्व सुटे भाग अभिषेकने थ्री-डी प्रिंटींगच्या मदतीने स्वत:च तयार केले आहेत. विशेष म्हणजे त्याने ही सर्व प्रक्रिया इंटरनेटवर सादर केली आहे. तर ‘गिटहब’ या संकेतस्थळावर याचा सोर्सकोडदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही स्वत: जीआयएफ अ‍ॅनिमेशनच्या प्रतिमा काढणारा कॅमेरा तयार करू शकतो.

पहा: इन्स्टाजीफ कॅमेर्‍याची प्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here