अबब…तब्बल १२८ जीबी रॅम असणारा लॅपटॉप !

0

लेनोव्होने थिंकपॅड पी५२ हा नवीन लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यामध्ये तब्बल १२८ जीबी इतक्या रॅमसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या अनेक हाय-एंड लॅपटॉप बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यात अनेकांमध्ये ८ जीबी वा त्यापेक्षा जास्त रॅम असते. अर्थात सर्वसाधारण युजरला इतकी रॅम पुरेशी असते. काही गेमिंग लॅपटॉप मॉडेल्समध्ये यापेक्षा जास्त रॅम असते. बाजारात सध्या ३२ जीबी रॅम असणारी अशी काही मॉडेल्स उपलब्ध आहेत. तथापि, आता लेनोव्हो कंपनीने तब्बल १२८ जीबी रॅम असणारा थिंकपॅड पी५२ हा लॅपटॉप ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. अतिशय उच्च दर्जाच्या संगणकीय कामांसाठी हे लॅपटॉप उपयुक्त ठरणार आहे. तसेच यामध्ये ६ टेराबाईट इतके इनबिल्ट स्टोअरेजदेखील देण्यात आले आहे. याच्या उर्वरित व्हेरियंटमध्ये कमी रॅम आणि स्टोअरेजचे पर्यायदेखील देण्यात आले आहेत. हा लॅपटॉप व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि त्रिमीती अर्थात ‘थ्री-डी’शी संबंधीत कामांसाठी वापरता येणार आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, लेनोव्हो थिंकपॅड पी५२ या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फोर-के क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तर यातील अन्य व्हेरियंटमध्ये फुल एचडी डिस्प्लेचाही पर्याय दिलेला आहे. यामध्ये इंटेलचा आठव्या पिढीतील झेनॉन प्रोसेसर दिलेला असून याला एनव्हिडीयाचा क्वॉड्रो पी३२०० या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. फेसियल रिकग्नीशन प्रणालीसाठी यात इन्फ्रा-रेड प्रकारातील कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात एचडी वेबकॅमदेखील असेल. अजून एक विशेष बाब म्हणजे यामध्ये युजर्सला पाच ऑपरेटींग सिस्टीम्सचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये वर्कस्टेशन्ससाठी असणारी विंडोज १० प्रो; विंडोज १० प्रो; विंडोज १० होम; उबंटू अथवा रेड हॅट लिनक्स आदींचा समावेश आहे. हा लॅपटॉप नेमका किती मूल्यात मिळेल याची माहिती मात्र लेनोव्हो कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये याला अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here