अँड्रॉइड ऑटो प्रणालीत सॅटेलाईट प्रतिमा दिसणार

0
अँड्रॉइड ऑटो, android auto

अँड्रॉइड ऑटो या कारच्या डॅशबोर्डवरील सिस्टीमध्ये आता सॅटेलाईट म्हणजेच उपग्रहीय प्रतिमा दिसण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

सध्या बहुतांश कारच्या डॅशबोर्डवर इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येत आहे. यामध्ये एक टचस्क्रीनयुक्त डिस्प्ले दिलेला असून याच्या माध्यमातून विविध टुल्स देण्यात येतात. यासाठी गुगलने अँड्रॉइड ऑटो ही खास प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये कुणीही युजर आपल्या स्मार्टफोन कनेक्ट करू शकतो. याच्या मदतीने स्मार्टफोनवरील विविध फंक्शन्स हे कारच्या डॅशबोर्डमध्ये वापरता येतात. सध्या अँड्रॉइड ऑटोला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्यांनीही याच प्रकारातील आपापल्या सिस्टीम्स सादर केल्या आहेत. यात अ‍ॅपलच्या कार प्ले या प्रणालीचा समावेश आहे. अर्थात असे असले तरी जगभरात गुगलचीच प्रणाली आघाडीवर आहे. याची उपयुक्तता वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न गुगलतर्फे करण्यात येत आहेत. या अनुषंगाने यामध्ये आता एका नवीन फिचरचा समावेश करण्यात आला असून ते वाहनचालकांना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

खरं तर, अँड्रॉइड ऑटोमध्ये आधीपासूनच गुगल मॅप्स देण्यात आलेला आहे. याच्याच मदतीने कार चालकाला दिशादर्शनाची माहिती होत असते. तथापि, आजवर यामध्ये फक्त बेसिक व्ह्यू देण्यात आला होता. म्हणजेच यात रस्त्यांची नावे, महत्वाच्या ठिकाणांची माहिती आदींना पाहता येत होते. तथापि, यामध्ये आजवर गुगल मॅप्समधील सर्वात उपयुक्त मानल्या जाणारा सॅटेलाईट व्ह्यू पाहण्याची सुविधा नव्हती. या फिचरचा वापर करून कुणीही संगणक अथवा अँड्रॉईड वा आयओएस प्रणालीवरील स्मार्ट उपकरणांमध्ये जगातील कोणत्याही ठिकाणाची उपग्रहातून घेतलेली प्रतिमा पाहू शकतो. अर्थात हा त्या लोकेशनचा एरियल व्ह्यू असतो. यामुळे त्या स्थळाविषयी अजून अचूक माहिती मिळण्यासाठी मदत होत असते. नेमके हे फिचर आजवर अँड्रॉईड ऑटामध्ये नव्हते. या पार्श्‍वभूमिवर, आता यात या फिचरचा समावेश करण्यात आला आहे. ताज्या अपडेटच्या माध्यमातून याला प्रदान करण्यात आले आहे. म्हणजेच आता कारच्या डॅशबोर्डवर असणार्‍या डिस्प्लेमध्ये कुणीही वाहनचालक त्याला हव्या असणार्‍या भौगोलिक स्थळाचा सॅटेलाईट व्ह्यू पाहू शकतो. यासाठी इंटरनेटचा डाटादेखील मोठ्या प्रमाणात लागणार असल्याच्या बाबीकडे कानाडोळा करता येणार नाही. अर्थात आता बहुतांश कंपन्यांनी किफायतशीर डाटा प्लॅन्स उपलब्ध केल्यामुळे यासाठी फारशी अडचण येणार नसल्याची बाब उघड आहे. दरम्यान, अँड्रॉइड ऑटो प्रणालीचे हे अपडेट जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे गुगलने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here